नवी मुंबई: अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५६ वर्षीय महिलेचा जीव नावाशेव्हा वाहतूक पोलिसांनी वाचवला. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली, आणि या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.
मुलुंड येथील राहणारी ही महिला आत्महत्या करण्याच्या उद्देशाने अटल सेतूवर आली होती. मात्र, वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि समयसूचकतेमुळे वाहतूक पोलीस कर्मचारी ललित शिरसाठ, किरण मात्रे, यश सोनवणे, आणि मयूर पाटील यांनी या महिलेचे प्राण वाचवले.
अटल सेतूवरून आत्महत्येच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. २४ जुलै रोजी एका ३८ वर्षीय व्यक्तीने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव श्रीनिवास कुरुकुट्टी असून, ते डोंबिवली येथे राहत होते. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला होता. त्याआधी, वरळी सी-लिंकवरून देखील अशाच प्रकारे एका व्यक्तीने आत्महत्या केली होती, ज्याने मुलाला फोन करून आपली निर्णयाची माहिती दिली होती.
मुंबई शहर आणि परिसरात गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. १० जुलै रोजी भाईंदर रेल्वे स्थानकात घडलेल्या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती, जिथे बाप आणि मुलाने अचानक धावत्या लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केली होती.
अशा घटनांनी चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे, आणि मनोविकारतज्ञांनी या समस्येला गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त केली आहे.