पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर धावत्या बसला लागलेल्या आगीत बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. कडमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ग्रँड हॉटेलसमोर ही धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बसचे मोठे नुकसान झाले आहे. बसमध्ये प्रवास करणारे सर्व १७ प्रवासी सुखरूप आहेत.
ही भीषण आग आज (शुक्रवार) सकाळी सुमारे नऊ वाजता लागली. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस हैदराबादहून पुण्याकडे जात होती. आगीमुळे बस पूर्णतः जळून खाक झाली असून, पुणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे महामार्गाच्या दोन्ही बाजू बंद करण्यात आल्या होत्या.
या घटनेत बसचा टायर फुटल्याने बसला आग लागली. काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण बस अपघातांमध्ये अनेक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आजही बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने सर्व प्रवाशांना त्वरित खाली उतरवले. काही क्षणातच संपूर्ण बसला आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.