लोणावळा, १ ऑगस्ट २०२४: मावळ तालुक्यातील युवकांमध्ये व्यसनमुक्ती मोहिमेअंतर्गत IPS सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा परिसरात दोन छापे मारण्यात आले. या कारवाईत १८ लाख रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या असून, पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे छापे २९ आणि ३० जुलै रोजी पाथरगाव गाव (जुना मुंबई-पुणे महामार्ग) आणि नंगरगाव येथे करण्यात आले.
कामशेतजवळ ५.०५ ग्रॅम एमडी जप्त २९ जुलै रोजी रात्री ११:४० वाजता IPS सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एका व्यक्तीने चारचाकी वाहनातून एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आणले आहेत. त्यानंतर पोलिसांनी हॉटेल मावळ माची, पाथरगाव (कामशेतजवळ) जुना मुंबई-पुणे महामार्गावर एक कार संशयास्पद स्थितीत उभी असताना दिसली. पोलिसांनी वाहनाच्या चालकाला चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये ५.०५ ग्रॅम एमडी पावडर सापडली, जी विक्रीसाठी आणली होती. यामध्ये योगेश केशव गायकवाड (रा. कांब्रे, मावळ) आणि नारायण सोपन डाभाडे (रा. जांभुळ, मावळ) या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असून, त्यांची चारचाकी वाहन देखील जप्त करण्यात आली आहे. या घटनेची नोंद पोलीस हवालदार अमोल नानावरे यांनी कामशेत पोलीस ठाण्यात केली असून, BNS कलम ३(५) आणि अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
लोणावळ्यातील छाप्यात ७.०१ ग्रॅम एमडी जप्त ३० जुलै २०२४ रोजी IPS सत्यसाई कार्तिक आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे नंगरगाव, लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा मारला. या छाप्यात शाहरुख असलम शेख (रा. केवारे वसाहत, मावळ), नितीन भारत काळेकर (रा. केवारे वसाहत, मावळ), आणि साजिद अकबर शेख (रा. लोणावळा) या तिघांना ७.०१ ग्रॅम एमडी ड्रग्जसह KTM ड्यूक बाइकवर अटक करण्यात आले. पोलीस हवालदार सुभाष शिंदे यांनी या घटनेची नोंद लोणावळा शहर पोलीस ठाण्यात केली असून, अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १,२२,२१० रुपयांचे एमडी ड्रग्ज, एक चारचाकी आणि एक बाइक जप्त करण्यात आली असून, जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत १८,२५,००० रुपये आहे. या छापेमारीचे नेतृत्व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. या पथकात सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नितेश (बंटी) कावडे, अंकुश नायकुड, दत्ता शिंदे, गणेश येळवंडे, सुभाष शिंदे, अंकुश पवार, अमोल नानावरे, महेश थोरात, गणेश ठाकूर आणि प्रतीक काळे यांचा समावेश होता.