Home Breaking News पिंपरी चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; शस्त्र विरोधी मोहिमेत ५० पिस्तूल व कोयत्यांचा...

पिंपरी चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; शस्त्र विरोधी मोहिमेत ५० पिस्तूल व कोयत्यांचा मोठा साठा जप्त, २५ सराईत गुन्हेगारांना अटक

पिंपरी चिंचवड : अवैध शस्त्रबाजी व सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर कठोर कारवाई करत पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठी मोहीम उभी केली आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष शस्त्रविरोधी मोहिमेत अवघ्या २५ दिवसांत तब्बल ५० पिस्तूल आणि ७९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
ही मोहीम १३ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२५ या कालावधीत हाती घेण्यात आली होती. यामध्ये सर्व पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट यांच्यात स्पर्धा ठेवण्यात आली. त्यातून गुन्हे शाखा युनिट चारने तब्बल ९ पिस्तूल जप्त करून पहिला क्रमांक पटकावला, गुंडाविरोधी पथकाने ७ पिस्तूल जप्त करत दुसरा तर युनिट दोनने तिसरा क्रमांक मिळवला.
या मोहिमेत आतापर्यंत ४५ आरोपींना अटक करून ४० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर धारदार शस्त्रे बाळगणाऱ्यांवर ९४ गुन्हे दाखल करून ६६ आरोपींना पकडण्यात आले आहे. जप्त शस्त्रसाठ्यामध्ये ९१ कोयते, १२ तलवारी, चार पालघन आणि सहा चाकूंचा समावेश आहे. यातील ५० शस्त्रांमध्ये एक गावठी कट्टा आणि ४९ पिस्तूलांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे गुन्हे शाखा युनिट चारने मोक्यातून सुटलेला आरोपी पवन देवेंद्र बनेटी (रा. पिंपळे गुरव) याला अटक करून त्याच्याकडून दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. याशिवाय पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील कुख्यात गुंड गणेश कांबळे उर्फ मॅड गण्या, ऋषीकेश ऊर्फ शेऱ्या आडागळे, बाबा सैफन शेख, राहुल ऊर्फ सोन्या ढगे, प्रताप ऊर्फ बाळु पवार, वैभव विटे यांच्यासह २५ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त विशाल गायकवाड, संदिप आटोळे, डॉ. बापु बांगर, शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले.
या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड परिसरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या गेल्या असून, नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे. पोलिसांच्या या यशस्वी मोहिमेचं सर्वत्र कौतुक होत आहे.