पुणे: पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचार सुरू करण्याआधी दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेने प्राण गमावले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून, रुग्णालयाच्या अमानवीय भूमिकेवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
पैशाअभावी माणुसकी संपली?
गर्भवती तनिषा सुशांत भिसे या प्रसूतीच्या वेदनांनी त्रस्त होत्या. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेले, मात्र उपचार सुरू करण्याआधी १० लाख रुपयांची डिपॉझिट मागितली. घरच्यांनी सध्या अडीच लाख रुपये भरतो, उर्वरित नंतर देऊ असे सांगितले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या विनवण्या धुडकावल्या आणि उपचार न करता महिलेला बाहेर पाठवले.
दुसऱ्या रुग्णालयात हलवताना जीव गमावला
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तत्काळ उपचार न केल्याने आणि अॅम्ब्युलन्स उपलब्ध न मिळाल्याने कुटुंबीयांनी मोठ्या हालअपेष्टांनी त्यानंतर २५ किमी दूर वाकडमधील सूर्या हॉस्पिटलमध्ये महिलेला नेले. येथे महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला. परंतु, योग्य वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्यामुळे तब्येत ढासळली. डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी मणिपाल हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला, मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला.
सत्ताधाऱ्यांच्या फोनलाही दीनानाथ रुग्णालयाचा नकार
तनिषा भिसे यांच्या पतीने, जो भाजप आमदार अमित गोरखे यांचा स्वीय सहाय्यक आहे, त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे अनेकदा विनंती केली. इतकेच नव्हे, तर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातूनही रुग्णालयाला फोन केला गेला, तरीही प्रशासनाने कोणतेही सहकार्य केले नाही. या घटनेवर आता राजकीय वर्तुळातही तीव्र संताप व्यक्त केला जात असून, रुग्णालयाच्या अमानुष वागणुकीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
कुटुंबाच्या दुहेरी वेदना – आनंदात दुःखाचा कडेलोट
तनिषा भिसे यांनी जुळ्या गोंडस मुलींना जन्म दिला, मात्र त्याचवेळी त्यांची आई पैशाच्या अभावामुळे वैद्यकीय व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे काळाच्या पडद्याआड गेली. कुटुंबाला एका बाजूला नवजात मुलींचा जन्म झाल्याचा आनंद असताना, दुसऱ्या बाजूला आईला गमावल्याची असह्य वेदना सहन करावी लागली.
नागरिकांमध्ये संतापाची लाट – कठोर कारवाईची मागणी
या घटनेनंतर संपूर्ण पुणे शहर हादरले असून, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बेजबाबदार आणि मुजोर वागण्याविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे. पैशाअभावी उपचार नाकारण्याच्या प्रकारामुळे अनेक कुटुंबे संकटात येऊ शकतात, म्हणूनच या प्रकरणात दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.