पुणे शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई करत कोथरुड खून प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. अखेर, वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या आणि गुन्हे शाखेच्या युनीट ३ च्या टीमने यशस्वी सापळा रचत या कुख्यात गुन्हेगाराला अटक केली आहे.
गुन्हेगारीचा वाढता आलेख आणि पोलिसांची धडाकेबाज कारवाई
दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे शहरातील युनीट ३, गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदारांच्या मदतीने मोठी कारवाई करत, कोथरुड भागात झालेल्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी बंडया ऊर्फ सिद्धार्थ अनिल नागटिळक (वय २२, रा. साईनाथ वसाहत, कोथरुड) याला कर्वेनगर येथून अटक केली.
दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपी बंडया नागटिळक हा डिपी रोड, कर्वेनगर येथे थांबलेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, पोलिसांनी त्वरित कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याचा खूनाच्या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सराईत गुन्हेगाराची पार्श्वभूमी
बंडया नागटिळक हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, कोथरुड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यामुळे, त्याच्या अटकेमुळे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
पोलिसांच्या उच्चस्तरीय पथकाची मेहनत रंगली
ही धडाकेबाज कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ३) संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त (कोथरुड विभाग) भाऊसाहेब पठारे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे (वारजे माळवाडी पोलीस ठाणे) आणि पोलीस निरीक्षक रंगराव पवार (युनीट ३, गुन्हे शाखा) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आरोपीला अटक केली.
कोण-कोण होते कारवाईमध्ये सहभागी?
या कारवाईत पोलीस अंमलदार विनोद भंडलकर, विनोद जाधव, गणेश सुतार, हरिष गायकवाड, प्रतीक मोरे आणि इसाक पठाण यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले आवश्यक!
पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी ही नागरिकांसाठी चिंतेची बाब बनली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या प्रकरणात आरोपीला लवकरच अटक करण्यात यश आले, मात्र अशा घटनांना कायमचा आळा घालण्यासाठी आणखी कठोर उपाययोजना आवश्यक असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.