आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य पोलिस दलात वरिष्ठ पातळीवर बुधवारी (ता.३१) मोठा फेरबदल करण्यात आला. या इलेक्शन बदल्यात डीसीपी ते अॅडिशनल डीजीपी लेवलपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक (एसपी) अंकित गोयल यांचा समावेश आहे.गोयल यांची सव्वा वर्षातच उचलबांगडी करण्यात आली. ते गडचिरोलीचे एसपी असताना पुणे एसपी म्हणून बदलीवर आले होते.आता त्यांची पुन्हा गडचिरोलीलाच मुदतपूर्व बदली झाली आहे. गृहविभागाने त्यांची प्रमोशनवर गडचिरोली रेंजचे डीआयजी (पोलिस उपमहानिरीक्षक) म्हणून बदली केली. त्यांच्या जागी राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) एसपी पंकज देशमुख आले आहेत.पंकज देशमुखांनी यापूर्वी पुणे शहर पोलिस दलात डीसीपी म्हणून काम केलेले आहे. पुणे ग्रामीणचे क्षेत्र खूप मोठे असल्याने त्यांच्यापुढे रिझल्ट दाखविण्याचे आव्हान आहे. मात्र, पुण्यात व सीआयडीतही पु्ण्यातच त्यांनी काम केले असल्याने हे आव्हान ते पेलतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आहेत. अशाप्रकारे महसूल आणि पोलिस अशा दोन्ही विभागांचे पुणे जिल्ह्याचे प्रमुख हे देशमुख आहेत. त्यातून जिल्ह्यात एकप्रकारे देशमुखीच आली आहे.