पिंपरी चिंचवड: शीख संप्रदायाचा पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब मध्ये संत परंपरेतील अनेक संतांच्या वाणीसह संत शिरोमणी संत नामदेव यांच्या अभंगांचा समावेश आहे. ही बाब महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील आध्यात्मिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करणारी ठरते. भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारा हा सांस्कृतिक वारसा दोन्ही राज्यांना एका सूत्रात बांधतो आणि राष्ट्रीय एकात्मतेचे सुंदर उदाहरण ठरतो, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिका संचलित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ यांच्या वतीने पंजाबमधील घुमान येथे नुकताच पाच दिवसीय अभ्यास दौरा पार पडला. संत नामदेव महाराजांनी वास्तव्य केलेल्या या पवित्र स्थळी संतपीठाच्या माध्यमातून आयोजित दौऱ्यात १८ सदस्यांनी सहभाग घेतला. दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात या सर्वांचा महापौरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
संतपरंपरेचा जागतिक सेतू
घुमान येथील संत नामदेव महाराज मंदिरात संतपीठाचे संचालक हभप राजू महाराज ढोरे यांनी “तु अगाध वैकुंठनायका | तेरे चरणो मेरा माथा ||” या अभंगावर प्रभावी कीर्तन सादर केले. अभंगातील प्रत्येक चरणाचा अर्थ स्पष्ट करत विविध सांप्रदायिक दृष्टांतांद्वारे भक्तीचा संदेश देण्यात आला. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील वारकरी परंपरेनुसार प्रथमच मूळ मंदिरात हिंदी भाषेत कीर्तनसेवा पार पडली, ही ऐतिहासिक घटना मानली जात आहे.
शैक्षणिक व सांस्कृतिक देवाणघेवाण
या अभ्यास दौऱ्यात घुमान इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, बाबा नामदेवजी गव्हर्नमेंट डिग्री कॉलेज तसेच बाबा आया सिंग रिअरकी कॉलेज येथे भेटी देऊन शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचा संवाद साधण्यात आला. भाषा, समाजशास्त्र, संगीत आणि कला विषयातील शिक्षकांसह संतपीठाचे पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले होते.
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
संत नामदेवांच्या अभंगांचा समावेश गुरु ग्रंथ साहिबमध्ये असल्यामुळे महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील सांस्कृतिक सेतू अधिक दृढ झाला आहे. संतांच्या विचारांतून प्रेरणा घेत समाजात ऐक्य, बंधुता आणि सद्भावना वाढविणे ही काळाची गरज आहे. ही अमूल्य परंपरा जपणे आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
संतपीठाच्या माध्यमातून आयोजित हा अभ्यास दौरा आध्यात्मिक समन्वय आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.