Home Breaking News पुणे पोलिसांची मोठी कारवाई : विधीसंघर्षित बालकाकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई : विधीसंघर्षित बालकाकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस हस्तगत!

पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात पोलिसांनी यशस्वी कारवाई करत एका विधीसंघर्षित बालकाच्या ताब्यातून अवैध गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. पोलिसांनी केलेल्या या तत्पर कारवाईमुळे परिसरात संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापासून बचाव झाला आहे.
दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे आणि अभिनय चौधरी हे परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की, नवले पुलाकडून कात्रजकडे जाणाऱ्या शहीद कर्नल पेट्रोल पंपासमोरील सर्व्हिस रोडवर एक इसम गावठी कट्टा घेऊन उभा आहे.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे एका विधीसंघर्षित बालकाला संशयास्पद हालचाली करताना पाहून त्याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यात रु. ५०,००० किंमतीचा गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस (एकूण रु. ५०,५०० मुद्देमाल) आढळून आला. पोलिसांनी तत्काळ शस्त्र जप्त करून त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ४५८/२०२५ अन्वये भा.द.वि. कलम ३, २५ आणि म.पो.अधि.क. ३७(१)(३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ २, श्री. मिलींद मोहीते, तसेच मा. सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पोलिसांचा मोठा सहभाग असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, तसेच पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार आणि संदीप आगळे यांनी उल्लेखनीय योगदान दिले. या यशस्वी कारवाईमुळे पुणे शहर पोलीस दलाच्या दक्षतेचा आणखी एक प्रत्यय आला आहे. पोलीस दलाने वेळेवर केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश बसण्यास मदत होईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.