पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन आणि विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्या वतीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मा. श्री. शेखरजी सिंह यांचा ‘‘नागरी सत्कार सोहळा’’ चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला. शहराच्या सर्वच घटकांचा सहभाग असलेल्या या सोहळ्यात नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, अधिकारी आणि विद्यार्थी यांनी एकत्र येऊन शहराच्या प्रगतीसाठी मोलाचं योगदान देणाऱ्या शेखर सिंह यांचा सन्मान केला.
या कार्यक्रमात संत साहित्याचे अभ्यासक व संतपीठ संचालक डॉ. सदानंद मोरे, फेडरेशनचे अध्यक्ष श्री. संजीवन सांगळे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान चिमुकली विद्यार्थिनी आराध्या कुलकर्णी हिने “मला शेखर सिंहसारखे आयुक्त व्हायचेय” असं मनोगत व्यक्त करत सर्वांचे मन जिंकले.
यावेळी विविध संस्था, समाजसंघटना आणि व्यावसायिक प्रतिनिधींनी शेखर सिंह यांच्या कार्याचा गौरव केला. विशेषतः समाविष्ट गावांच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या नियोजनबद्ध आणि दृष्टीकोनात्मक कामाचे सर्व स्तरातून कौतुक झाले. “वाद न घालत, प्रत्यक्ष कृती करत विकास घडवणारे आयुक्त” अशी ओळख असलेल्या शेखर सिंह यांनी तीन वर्षे दोन महिने पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचा पाया मजबूत केला.
वाकडपासून चऱ्होलीपर्यंत शहरातील अनेक प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील पारदर्शकतेसाठी त्यांनी घेतलेले निर्णय आज नागरिकांच्या मनात कायम स्मरणात राहतील. या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी शेखर सिंह यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि “शहराच्या विकासात त्यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल” असा एकमुखाने अभिप्राय व्यक्त केला.
उपस्थित मान्यवर: अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, तृप्ती सांडभोर, क्रेडाईचे अरविंद जैन, बांधकाम क्षेत्रातील दिलीप पटेल, शिक्षणक्षेत्रातील अश्विनी कुलकर्णी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे दिपक करंदिकर, भाजपा सरचिटणीस विकास डोळस, तसेच विविध समाजसंघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शेवट भावनिक वातावरणात झाला. नागरिकांनी उभं राहून शेखर सिंह यांना दीर्घकाळ टाळ्यांच्या गजरात निरोप दिला.