लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर कडक कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे यांनी विशेष मोहिम राबवून पोलिसांना मोठे यश मिळवून दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी गुरुकृपा निवास, माळी मळा, लोणीकाळभोर येथे गुप्त सापळा रचून मोठी धाड टाकली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पत्र्याच्या शेडखाली सुरू असलेल्या पैशावरच्या जुगारावर अचानक छापा टाकला आणि ११ जुगारी इसमांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईत रोख रक्कम, जुगार साहित्य, मोबाईल फोन आणि ५ मोटारसायकली असा एकूण ५,४३,०१०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
छापा टाकताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे आणि पोलीस अंमलदारांची टीम उपस्थित होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जुगार अड्डा चालविणाऱ्या घरमालकासह सर्व जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५५५/२०२५ प्रमाणे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याचबरोबर, वरिष्ठ निरीक्षक पन्हाळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हद्दीतील अवैध धंदे संपविण्याची मोहिम अतिशय जोमाने राबवली आहे. त्याअंतर्गत आजपर्यंत—
-
अवैध दारू विक्रेत्यांवर १०३ कारवाया
-
गांजा विक्रीवर १४ कारवाया
-
अवैध जुगारावरील ३६ छापे
-
गुटखा विक्री/साठ्यावर १ कारवाई
-
अशा एकूण १५४ प्रभावी कारवाया करण्यात आल्या आहेत.
तसेच अवैध धंदे चालविणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत—
-
२ जुगार चालकांवर MPDA कारवाई
-
१ महिलेला तडीपार
-
१ जुगार चालकाला तडीपार
अशी मजबूत कायदेशीर पावले उचलण्यात आली आहेत, ज्यामुळे परिसरातील नागरिकांत समाधानाचा माहोल निर्माण झाला आहे.
लोणीकाळभोर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंद्यांना मोठा आळा बसणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







