पुणे : फरासखाना पोलीस स्टेशनच्या दक्ष आणि तात्काळ कारवाईमुळे दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी तब्बल ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून, चार दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मुलींना शोधून काढले. या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुकास्पद ठरली आहे.
दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. १९०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रार अशी होती की, स्वाधार अनाथालय, बुधवार पेठ, पुणे येथे राहणाऱ्या वय १३ वर्षे असलेल्या दोन मुली — या राजमाता जिजाऊ विद्यालय, कसबा पेठ येथे शिकत होत्या आणि शाळेतून परतताना दोघीही बेपत्ता झाल्या होत्या.
सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फरासखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक (अ.का.) श्री. उत्तम नामवाडे यांनी तत्काळ तपासाची जबाबदारी घेतली. पोलीस उपनिरीक्षक वैभव गायकवाड आणि अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. प्रत्येक पथकाला स्वतंत्र कार्यक्षेत्र देऊन संपर्कात राहून समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सदर मुली या अनाथालयात राहात असल्याने त्यांच्या नातेवाईकांची किंवा ओळखीच्या व्यक्तींची मदत घेणे शक्य नव्हते, ज्यामुळे तपास आणखी कठीण झाला. तरीही तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रविण पासलकर, प्रशांत पालांडे, महेश राठोड, आणि चेतन होळकर यांनी कसबा पेठ, पवळे चौक, कुंभारवेस चौक आणि शिवाजीनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.
या प्रयत्नांमुळे पहिली मुलगी शिवाजीनगर वाकडेवाडी येथे त्याच रात्री सापडली. मात्र दुसरी मुलगी अद्याप बेपत्ता असल्याने पोलिसांनी आणखी गतीने शोधमोहीम सुरू ठेवली. दि. ८ ऑक्टोबरपासून ११ ऑक्टोबरपर्यंत, सलग चार दिवस पोलीस पथकांनी शिवाजीनगर, पाटील इस्टेट, संगमवाडी, विश्रांतवाडी, दिघी, आळंदी, मोशी आणि भोसरी परिसरातील सीसीटीव्ही तपासले.
शेवटी पथकाला मोशीतील तुपे वस्ती, गणेशनगर परिसरात मुलगी दिसल्याची माहिती मिळाली. पोलीस अंमलदार प्रविण पासलकर आणि प्रशांत पालांडे यांनी तात्काळ रात्रीच कारवाई करत ती मुलगी रस्त्याच्या कडेला बसलेली असल्याचे आढळले. मुलगी सुखरूप असल्याचे निश्चित झाल्यावर पोलिसांनी तिला ताब्यात घेत फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये आणले, आणि हा गुन्हा यशस्वीपणे उघडकीस आला.
या कार्यवाहीत मा. पोलीस उपायुक्त, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेली चिकाटी व संवेदनशीलता अत्यंत प्रशंसनीय आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे केवळ दोन निष्पाप जीव वाचले नाहीत, तर नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.