मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकत आज ‘माता रमाबाई आंबेडकर नगर’ व ‘कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे’ भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार प्रमुख उपस्थित होते.
हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) यांच्या संयुक्त भागीदारीत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकूण १७,००० घरांचे बांधकाम होणार असून, पहिल्या टप्प्यात ४,३४५ घरांचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
या पुनर्वसन योजनेचा उद्देश केवळ निवारा पुरविण्यापुरता मर्यादित नसून, निवासींच्या जीवनमानात आमूलाग्र सुधारणा घडविणे हा आहे. ३०० चौ. फुट क्षेत्रफळाचे मोफत घरे, आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज इमारती, हिरवळयुक्त परिसर, मुलांसाठी खेळण्याची मैदाने, तसेच पर्यावरणपूरक बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबईत झोपडपट्टीमुक्तीचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकार ठाम आहे. ही योजना केवळ इमारती बांधण्याची नाही, तर सन्मानाने जगण्याची संधी देणारी योजना आहे.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “राज्यातील प्रत्येक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आधुनिक आणि टिकाऊ असेल, जेणेकरून झोपडपट्टीतील नागरिकांना सुरक्षित व सुसज्ज घरे मिळतील.”
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “या प्रकल्पामुळे हजारो कुटुंबांचे आयुष्य उजळणार आहे. शासनाच्या सर्वसमावेशक विकास दृष्टिकोनाचा हा उत्तम नमुना आहे.”
या प्रकल्पामध्ये आधुनिक सोयीसुविधा, चांगली वाहतूक व्यवस्था, शाळा, आरोग्य केंद्रे आणि सार्वजनिक बागा यांचा समावेश असेल. पुढील काही वर्षांत या भागाचे रूपांतर एक आदर्श पुनर्वसित वसाहत म्हणून होणार आहे.
हा उपक्रम ‘चाळीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवजीवनाची नवी सुरूवात’ ठरणार असून, मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसन मोहिमेत हा एक मैलाचा दगड ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.