पुणे (दि. ६ जुलै २०२५) : पुणे शहराच्या श्रद्धेचे प्रतीक, पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या जतन व संवर्धन कार्याचा भव्य शुभारंभ आज सकाळी ११ वाजता करण्यात आला. या ऐतिहासिक क्षणी, आमदार हेमंत रसाने यांच्या पुढाकारातून आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ₹४० लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर करण्यात आला आहे.
ही वास्तू केवळ धार्मिक नव्हे, तर हेरिटेज आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे तिथे जतन, जिर्णोद्धार आणि आधुनिकता यांचा समतोल राखत विकासकामे राबवली जाणार आहेत. मंदिर परिसरातील मूळ वास्तूचा ऐतिहासिक ढाचा कायम ठेवून, श्रद्धास्थानास अधिक आकर्षक आणि सुविधा-संपन्न बनवण्यासाठी ही कामे केली जाणार आहेत.

मुख्य वैशिष्ट्ये:
श्री कसबा गणपती मंदिराची जतन व संवर्धन प्रक्रिया अधिकृतरीत्या सुरू
₹४० लाख रुपयांच्या जिल्हा नियोजन निधीतून कामांना गती
हेरिटेज वास्तूची मूळ शैली कायम ठेवत सौंदर्यीकरणाचा संकल्प
श्रद्धा, परंपरा आणि शाश्वत विकास यांचा सुरेख मिलाफ
कार्यक्रमावेळी आमदार हेमंत रसाने यांनी सांगितले की,
“कसबा गणपती हे पुणेकरांचं श्रद्धास्थान आहे. या देवस्थानाच्या जतन-संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देणे ही केवळ आमदार म्हणून नव्हे तर पुणेकर म्हणून माझी जबाबदारी आहे. भविष्यात हे मंदिर हे धार्मिक पर्यटनाचं आणि पुण्याच्या संस्कृतीचं अनमोल प्रतीक म्हणून अधिक उजळेल, हा विश्वास वाटतो.”
या कार्यक्रमास विविध मान्यवरांचे, नगरसेवकांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि स्थानिक नागरिकांचे मोठ्या संख्येने उपस्थित राहून कौतुकाचे उद्गार काढले गेले.






