Home Breaking News औंध परिसरात दहशत माजवणाऱ्या सात कुख्यात गुंडांना पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गावठी...

औंध परिसरात दहशत माजवणाऱ्या सात कुख्यात गुंडांना पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गावठी कट्टा, कोयते, वाहनांसह ७.६ लाखांचा मुद्देमाल जप्त

204
0

पुणे : औंध येथील विधाते वस्तीमध्ये २८ जून २०२५ रोजी मध्यरात्री दहशत माजवणाऱ्या टोळीवर चतुःश्रृंगी पोलिसांनी निर्णायक कारवाई करत सात आरोपींना अटक केली असून सुमारे ७ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदर घटना घडली तेव्हा फिर्यादी आणि त्यांचे मित्र गप्पा मारत बसलेले असताना १२ ते १५ जणांच्या टोळीने हातात लाकडी दांडके व धारदार शस्त्रं घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. या हल्ल्यात फिर्यादी व त्यांच्या मित्रांना बेदम मारहाण करण्यात आली होती.

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. २५३/२०२५ अन्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात सपोनि नरेंद्र पाटील, सपोनि अनिकेत पोटे व त्यांच्या तपास पथकाने सात आरोपींना मुळशी परिसरातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

प्रतीक सुनिल कदम (२६)

अमीर अल्लाउददीन शेख (२८)

अतुल श्याम चव्हाण (२७)

रॉबीन दिनेश साळवे (२६)

समीर अल्लाउददीन शेख (२६)

जय सुनिल घेंगट (२१)

अभिषेक अरुण आवळे (२४)

या आरोपींकडून जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये:

१ गावठी कट्टा

३ कोयते

१ चारचाकी वाहन

२ मोटारसायकली
एकूण किंमत – रु. ७,६०,०००/-

सदर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वीही चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर खटले दाखल आहेत. टोळीचा उद्देश नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून गुन्हेगारी वर्चस्व प्रस्थापित करणे हा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, मा. उप-आयुक्त श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे हे गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत सापडले.

पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अशा प्रकारच्या घटना घडल्यास तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.