Home Breaking News आई-वडिलांचाच अमानुष सौदा! पुण्यात अवघ्या ४० दिवसांच्या चिमुकलीची साडेतीन लाखांत विक्री; सहा...

आई-वडिलांचाच अमानुष सौदा! पुण्यात अवघ्या ४० दिवसांच्या चिमुकलीची साडेतीन लाखांत विक्री; सहा जणांना अटक

119
0

पुणे (प्रतिनिधी रेवती हिंगवे): सांस्कृतिक, शैक्षणिक आणि विचारप्रवृत्त पुणे शहरातून माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या ४० दिवसांच्या बाळाला साडेतीन लाख रुपये घेऊन विकल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला असून, या प्रकरणी बाळाचे आई-वडील आणि इतर चार मध्यस्थांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे सुरुवातीला बाळ हरवल्याचा बनाव करत मुलगी पळून गेली आहे अशी तक्रार आई-वडिलांनी स्वतः पोलिसांकडे केली. मात्र पोलिसांच्या चौकशीतून धक्कादायक सत्य उघडकीस आले — आई-वडिलांनीच आपल्या पोटच्या गोळ्याचा सौदा केला होता.

अटकेतले आरोपी कोण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेत घेतलेल्यांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:

मीनल ओंकार सपकाळ (आई)

ओंकार औदुंबर सपकाळ (वडील), वय २९, रा. बिबवेवाडी

साहिल अफजल बागवान, वय २७, रा. सातारा

रेश्मा शंकर पानसरे, वय ३४, रा. येरवडा

सचिन रामा अवताडे, वय ४४, रा. येरवडा

दीपाली विकास फटांगरे, वय ३२, रा. संगमनेर

सौद्यामागील वाद आणि उघडकीस आलेला प्रकार:

साडेतीन लाखांच्या या बाळ विक्री सौद्यापैकी मात्र दोनच लाख रुपये मध्यस्थांकडून दिले गेले, आणि उर्वरित रक्कम न मिळाल्यामुळे आई-वडिलांनी मध्यस्थांची फसवणूक झाल्याचे सांगत पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीच्या तपासादरम्यान ही भीषण बाब पोलिसांच्या लक्षात आली.

पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली असून मुलीला सुरक्षित ठिकाणी हस्तांतरित करण्यात आले आहे. तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली असून, बालकल्याण समितीकडे ताबा देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सामाजिक संताप आणि कायदा-सुव्यवस्थेची भूमिका:

ही घटना केवळ बालहक्कांचे उल्लंघन नाही, तर माणुसकीच्या मूलभूत मूल्यांवर आघात करणारी आहे. पैशांच्या हव्यासापोटी पालकत्व विकणाऱ्या घटनेने संपूर्ण पुणे शहरात संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसांनी कलम 370 (मानव तस्करी), 317, 420, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच बाळ विक्रीप्रकरणी आणखी कोणी गुन्ह्यात सहभागी आहे का याचा तपास सुरू आहे.