पिंपरी, दि. ०२ जानेवारी २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील सावित्रीबाई फुले स्मारक येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये रांगोळी प्रदर्शन, मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन, उत्कृष्ट बचतगट आणि स्पर्धा परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, एकपात्री नाट्यप्रयोग, शाहिरीचा भव्य कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि परिसंवाद आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्रबोधन पर्वाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भव्य रांगोळी प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. मोशी येथील महानगरपालिकेच्या शाळेजवळील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी खासदार, आमदार, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित राहणार आहेत.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन पर्वाच्या उद्घाटनानंतर पिंपरी येथील सावित्रीबाई फुले स्मारक येथे सकाळी १०.४० वाजता प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना व इतर योजनांबाबत मार्गदर्शन शिबीराचे उद्घाटन करण्यात येणार असून त्यामध्ये विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. शहरातील ५ उत्कृष्ट महिला बचतगट आणि स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानंतर भोसरी येथील महात्मा फुले प्राथमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांचा गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न होईल.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित “मी सावित्री फुले” हा एकपात्री नाट्यप्रयोग शारदा मुंडे सकाळी ११.३० वाजता सादर करणार आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रात १२.३० वाजता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित शाहिरीचा कार्यक्रम टीव्ही कलाकार ख्यातनाम शाहीर संतोष साळुंखे हे सादर करणार आहेत. दुपारी २.३० वाजता “सावित्रीच्या लेकी” या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण सिने अभिनेते ओम यादव करणार आहेत. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता नवी दिशा उपक्रमातील उत्कृष्ट महिला बचतगटाचा सत्कार महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.
सायंकाळी ४.३० वाजता “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि महिलांची भूमिका” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उद्योजिका डॉ.तृप्ती धनवटे-रामाने, पत्रकार अश्विनी डोके, शैलजा मोळक, पत्रकार शर्मिष्ठा भोसले, प्राध्यापक शीलवंत गायकवाड आणि इतर वक्त्यांचा सहभाग असणार आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता ‘’गौरव सावित्रीबाईंचा..’’ या सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाने प्रबोधनात्मक पर्वाची सांगता होणार आहे. हा कार्यक्रम संजय मगर आणि त्यांचे सहकारी सादर करतील.