हैदराबाद : चांदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या VV प्राईड हॉटेलमध्ये २४ वर्षीय युवक उदय कुमार याचा तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला. वाढदिवसाच्या उत्सवात घडलेली ही दुर्घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
उदय कुमार हा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होता. आपल्या काही मित्रांसोबत त्याने अशोक नगर आणि ज्योती नगर येथे केक कापून वाढदिवस साजरा केला होता. नंतर पार्टीची दुसरी फेरी VV प्राईड हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू होती. मात्र या आनंदाच्या क्षणांत एक दुर्दैवी घटना घडली.
रात्रीच्या सुमारास पार्टी चालू असताना, उदय हॉटेलच्या बाल्कनीत गेला. अचानक त्याच्यासमोर एक कुत्रा आला आणि उदयने त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही फूटेजमध्ये असे दिसून आले की उदय खेळत-खेळत कुत्र्याचा पाठलाग करत होता. याच वेळी तो आपला तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरील खुल्या खिडकीतून खाली पडला.
घटनेनंतर उदयला तातडीने गांधी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. चांदनगर पोलिसांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत संशयास्पद मृत्यूचा गुन्हा नोंदवला असून, तपास सुरू आहे.
उदयच्या अचानक जाण्याने मित्र मंडळी आणि कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. सीसीटीव्हीमध्ये नोंदलेले उदयचे शेवटचे क्षण सध्या व्हायरल होत आहेत, ज्यामुळे ही घटना अजूनच चर्चा होत आहे. यावेळी खिडकी का उघडी ठेवण्यात आली होती यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
हॉटेलमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे हॉटेल व्यवस्थापनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. हॉटेलच्या वरच्या मजल्यावर कुत्रा कसा पोहोचला, आणि खिडकी उघडी का ठेवली गेली होती, याबाबत चौकशी सुरू आहे. हॉटेलमधील सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत असल्याने स्थानिक प्रशासनही या घटनेबद्दल अधिक चौकशी करत आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
उदय हा ज्योती नगर, आरसी पुरम येथील रहिवासी होता. त्याच्या अचानक मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मित्रांसाठी आनंदाचा क्षण असलेला हा दिवस एक शोकांतिका ठरला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे.