पुणे शहर पोलीसांच्या गुन्हे शाखा युनिट ४ ने पुन्हा एकदा धडक कामगिरी करत शहरातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. तब्बल ११ महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला मिरज, सांगली येथे अटक करून पुणे पोलिसांनी कायद्याच्या कचाट्यात आणले. हा आरोपी खडकी पोलीस ठाण्यातील जबरी चोरी, दहशत माजविणे आणि शस्त्रांच्या धाकावर गुन्हे करण्यासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये पाहिजे होता.
आफरीद उर्फे गुडया सलिम शेख (वय २४, रा. इंदिरानगर, खडकी, पुणे) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर भारतीय दंड संहिता, भारतीय हत्यार कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट २०१३ आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत एकापेक्षा अधिक गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या तपासात त्याने आपल्या साथीदारांसह खडकी परिसरात हत्यारांचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा श्री. निखिल पिंगळे आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील युनिट-४ च्या पथकाने गुप्त माहितीदाराच्या मदतीने आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला.
१२ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष मोहिम राबवत पथकाने सांगलीतील मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत हिरा हॉटेल चौक येथे सापळा रचून आरोपीला जेरबंद केले. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांना तब्बल ११ महिन्यांचा दीर्घ प्रयत्न करावा लागला.
या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, पोलीस अंमलदार हरीष मोरे, सुभाष आव्हाड, वैभव रणपिसे, तसेच महिला पोलीस कर्मचारी रोहिणी पांढरकर आणि मयुरी नलावडे आदींचा मोलाचा सहभाग होता.
गुन्हेगारी विश्वात धाक निर्माण करणारा आणि पोलिसांना तब्बल ११ महिन्यांपासून चकवणारा आरोपी अखेर पोलिसांच्या सापळ्यात अडकला आहे. या कामगिरीमुळे खडकी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असून, गुन्हे शाखेच्या या पराक्रमाचे शहरभर कौतुक होत आहे.