पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अतिशय धाडसी आणि शिताफीने कामगिरी करत अवघ्या २ तासांत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून कायद्याच्या तावडीत आणले आहे. ही कारवाई केवळ पोलिसांच्या सजगतेचेच नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतच्या त्यांच्या बांधिलकीचेही उत्तम उदाहरण ठरली आहे.
दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी लोहीयानगर येथील इनामके मळा भागात सागर राजु अवघडे (वय ३३) याचा त्याच्या मामाच्या मुलानेच – सुरज नंदु सकट (वय २५) याने निर्घृण खून केला. केवळ गाडीची चावी न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून आरोपीने बुक्यांनी मारहाण करून सागर याचा जागीच मृत्यू घडवून आणला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या गंभीर घटनेचा तपास करण्याची जबाबदारी खडक पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीमती शर्मिला सुतार आणि श्री. मनोजकुमार लोंढे यांच्या खांद्यावर होती. त्यांनी तातडीने तपास पथक तयार करून, सर्व्हेलन्स टीमला योग्य त्या सूचना देत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान, पोलीस अंमलदार आशिष चव्हाण आणि इरफान नदाफ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी सुरज सकट हा लोहीयानगरमधील म्हसोबा मंदिर चौक परिसरात दिसून आला आहे. बातमी मिळताच तपास पथकाने तातडीने कारवाई करत शिताफीने आरोपीला पकडले. सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांच्या मार्गदर्शनाखालील टीमने दाखल गुन्ह्यात आरोपीस ६ ऑगस्ट रोजीच अटक केली.
या संपूर्ण कारवाईसाठी मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ १) श्री. ऋषिकेश रावले, तसेच सहा. पोलीस आयुक्त (फरासखाना विभाग) श्रीमती अनुजा देशमाने यांनी मार्गदर्शन केले.
खडक पोलिसांच्या या तातडीच्या कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले की, कायदा मोडणाऱ्यांसाठी पोलिसांची दक्षता आणि जलद कारवाई हे मोठे आव्हान ठरते.