Home Breaking News समृद्धी महामार्गावर उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी भीषण भगदाड! छत्रपती संभाजीनगरजवळ स्लॅब कोसळला; सुरक्षिततेवर...

समृद्धी महामार्गावर उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी भीषण भगदाड! छत्रपती संभाजीनगरजवळ स्लॅब कोसळला; सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह

छत्रपती संभाजीनगर – कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झालेल्या समृद्धी महामार्गावर आज भल्या पहाटे एक भीषण प्रकार घडला. छत्रपती संभाजीनगरजवळील एका पुलाचा स्लॅब कोसळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, महामार्गाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेमुळे “समृद्धी”चा खरा चेहरा समोर आला असल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त होत आहे.
महत्वाचे म्हणजे, हा भाग कालच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. केवळ काही तासांतच झालेली ही दुर्घटना म्हणजे दर्जाहीन बांधकामाचे उदाहरण असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि विरोधकांनी केला आहे.
दुर्दैवाने या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र या ठिकाणी प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील वाहनचालकांनी तातडीने प्रशासनाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस आणि आपत्कालीन सेवा तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल या महामार्गाच्या नव्या टप्प्याचे उद्घाटन करताना तो ‘भारतीय पायाभूत सुविधांचा ऐतिहासिक टप्पा’ असल्याचे म्हटले होते. मात्र, अवघ्या काही तासांतच घटलेल्या दुर्घटनेमुळे हा दावा जोरदार आव्हानात सापडला आहे.
विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने (ठाकरे गट) ही दुर्घटना म्हणजे “अविचारी उद्घाटन संस्कृती”चे परिणाम असल्याचे म्हटले आहे. “निष्कृष्ट दर्जाच्या कामांचा हा नमुना असून, ठेकेदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
महामार्ग विकास प्राधिकरणाकडून चौकशी सुरू
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) कडून या दुर्घटनेची तातडीने चौकशी सुरू करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित केली जात आहे आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
नागरिकांमध्ये नाराजी
स्थानिक नागरिकांनी माध्यमांशी बोलताना आपल्या नाराजीचा स्पष्टपणे उद्गार दिला. “हजारो कोटी खर्चून बनवलेल्या महामार्गाचे हे विदारक दृश्य आहे. एवढ्या मोठ्या उद्घाटनानंतर एवढ्या लवकर भगदाड का पडावे?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.