कर्नाटकातील दावणगेरे येथे एका कार्यक्रमादरम्यान भाजप आमदार बीपी हरीश यांनी महिला पोलिस अधीक्षकांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सार्वजनिक व्यासपीठावरून महिलांविषयी असंवेदनशील आणि अवमानकारक विधान केल्यामुळे त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आली आहे.
बीपी हरीश यांनी IPS अधिकारी उमा प्रशांत यांच्यावर टीका करताना म्हटले की,“मी एक आमदार आहे. पण एसपी जेव्हा मला कुठल्या कार्यक्रमात पाहतात, तेव्हा त्या तोंड फिरवतात. मात्र, त्या शमनूर कुटुंबांच्या सदस्यांची गेटवर उभ्या राहून वाट पाहतात. त्यांच्या घरातील पॉमेरियन कुत्र्याप्रमाणे वागतात.”
हे वक्तव्य केल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. राजकीय वर्तुळात महिला अधिकाऱ्यांचा अपमान झाल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विशेष म्हणजे, शमनूर कुटुंब हे काँग्रेस पक्षाशी संबंधित असून दावणगेरे भागात त्यांचा मोठा राजकीय दबदबा आहे. वरिष्ठ नेते शमनूर शिवशंकरप्पा आमदार, त्यांचा मुलगा एस.एस. मल्लिकार्जुन हे खाण व भूविज्ञान मंत्री, तर सून प्रभा मल्लिकार्जुन खासदार आहेत. त्यामुळे या विधानामागे राजकीय द्वेष असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
ही पहिली वेळ नाही की कर्नाटकमध्ये महिला अधिकाऱ्यांचा अपमान करण्यात आला आहे. अलीकडच्या काही महिन्यांत अशा घटना वारंवार घडल्या आहेत.
जुलै महिन्यात भाजपचे विधान परिषद सदस्य एन. रविकुमार यांनी तत्कालीन मुख्य सचिव शालिनी रजनीश यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करत म्हटले होते की, “त्या दिवसा नेहमी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या कामात व्यस्त असतात आणि रात्री सरकारी जबाबदाऱ्या पार पाडतात.”
यापूर्वी त्यांनी कुलबर्गीच्या उपायुक्त फौजिया तरन्नुम यांच्याबद्दल “त्या पाकिस्तानातून आल्या असतील” असे अपमानास्पद विधान केले होते.
या सलग घडणाऱ्या घटनांमुळे महिला अधिकारी व नोकरशहांचा सन्मान, सुरक्षितता आणि प्रतिष्ठा यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. समाजातील प्रतिष्ठित नेते आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी जर महिलांविषयी अशा प्रकारची वक्तव्ये करणार असतील, तर समाजावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो, असा इशारा महिला संघटनांनी दिला आहे.
सध्या बीपी हरीश यांच्या विधानावर विरोधी पक्ष आणि महिला संघटनांनी जोरदार आक्षेप घेतला असून, त्यांच्या अटकेची मागणीही होत आहे. महिलांचा सन्मान राखणे हे लोकप्रतिनिधींचे प्रथम कर्तव्य आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.