Home Breaking News पुण्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रवाशाकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; बंडगार्डन पोलिसांची मोठी...

पुण्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रवाशाकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; बंडगार्डन पोलिसांची मोठी कारवाई

37
0
पुणे शहरात प्रवाशाकडून जबरदस्तीने खंडणी उकळणाऱ्या चार जणांच्या टोळीला अटक करण्यात बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला मोठे यश मिळाले आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे उकळण्याच्या उद्देशाने या आरोपींनी एका प्रवाशाला मारहाण करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
फिर्यादी हे बिहार राज्यातील सारंग जिल्ह्यातील छपरा येथील रहिवासी असून त्यांच्या मित्राला पुण्यात रिक्षामध्ये प्रवास करत असताना चार अनोळखी इसमांनी अडवून मारहाण केली. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या पत्नीच्या मोबाईलवरून ऑनलाईन २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. भीतीपोटी संबंधित व्यक्तीच्या पत्नीने ऑनलाईन पैसे पाठवले. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ (५) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी तपास पथकाला तातडीने गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार तपास पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान गुलटेकडी परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन आरोपींना २५ फेब्रुवारी २०२६ रोजी ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेले आरोपी गणेश आण्णा जगधने (वय २९) आणि अमोल उत्तम गायकवाड (वय ३२) यांनी चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या साथीदारांबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अतुल रविंद्र गायकवाड (वय ३८) आणि संतोष राधाकिशन सरोदे (वय ३१) यांना २७ फेब्रुवारी २०२६ रोजी अटक केली.
तपासादरम्यान आरोपींकडून गुन्हा करताना वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली असून खंडणी म्हणून उकळलेल्या रकमेपैकी १० हजार रुपयेही पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू असून आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग संगिता आल्फान्सो शिंदे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तसेच पोलीस अंमलदार प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनीष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली. पुणे शहर पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांवर मोठा आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.