पुणे | प्रतिनिधी : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत वानवडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत अवैध गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. २ मार्च २०२६ रोजी वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांकडून नियमित पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस अंमलदार दया शेगर आणि अभिजीत चव्हाण यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार ढोबरवाडी, घोरपडी परिसरात एका वाहनातून मोठ्या प्रमाणात हातभट्टीची गावठी दारू वाहतूक करून विक्री करण्यासाठी थांबण्यात आल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दोन व्यक्ती आढळून आले. त्यांची ओळख लियाकत रोहीत अब्बासी (वय ३२, रा. ढोबरवाडी, सोपानबाग, पुणे) आणि समीर संजय राठोड (वय २३, रा. शिंदवणे काळे शिवार, ता. हवेली, जि. पुणे) अशी पटली.
वाहनाची तपासणी करताना पोलिसांना ३५ लिटर क्षमतेच्या काळ्या आणि निळ्या रंगाच्या प्लास्टिक कॅनमध्ये भरलेली एकूण ३३ कॅन म्हणजेच सुमारे १,१५० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. तसेच या दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला महिंद्रा कंपनीचा सुप्रो मिनी ट्रक (MH-12/SX-4668) देखील पोलिसांनी जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे ५ लाख ६५ हजार ५०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख करत आहेत.
ही कारवाई पुणे शहर पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता जाधव यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख तसेच पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, आशिष कांबळे, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विष्णु सुतार, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले आणि अर्षद सय्यद यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध दारू विक्री रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यामुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत होणार आहे.