Pune शहरात सिग्नल व गर्दीच्या ठिकाणी अपघाताचा बनाव करून वाहनचालकांची फसवणूक करत मोबाईल व इतर वस्तू जबरदस्तीने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील Meerut येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई Faraskhana Police Station यांच्या गुन्हे तपास पथकाने केली. आरोपींची नावे रवी ओमप्रकाश कोहली आणि अफजल कयूम अब्बासी अशी असून दोघेही मेरठ सिटी, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान मंगळवार पेठेतील अंजुमन मशिदीसमोर सिग्नलला थांबलेल्या एका चारचाकी कारच्या चालकाला या आरोपींनी लक्ष्य केले. गाडीने पायावरून गेल्याचा बहाणा करत त्यांनी चालकाला घाबरवले आणि त्याच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.
या घटनेनंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. तपासादरम्यान दोन संशयित इसम चोरी करताना दिसून आले. पुढील गुप्त माहितीच्या आधारे हे आरोपी समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील एका लॉजमध्ये येणार असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी आणखी काही गुन्ह्यांची कबुली दिली. Alankar Police Station हद्दीत ११ फेब्रुवारी २०२६ रोजी कोथरूड येथील कर्वे रोडवरील सारस्वत बँकेसमोर उभी असलेल्या कारमधून ॲपल कंपनीचा आयफोन १७ प्रो आणि एक पांढरे पॉकेट चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले.
तसेच Viman Nagar Police Station हद्दीत १९ ऑगस्ट २०२५ रोजी विमाननगर चौकात एका कार चालकाला गाडी पायावरून गेल्याचा बहाणा करून त्याच्याकडील सॅमसंग आणि वनप्लस कंपनीचे मोबाईल चोरी केल्याचेही तपासात समोर आले आहे.
या आरोपींनी पुणे शहरातील फरासखाना, अलंकार, विमानतळ आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत अशा प्रकारचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपींना पुढील तपासासाठी फरासखाना पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून सिग्नलवर किंवा गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे अपघाताचा बहाणा करून जवळ येणाऱ्या संशयित व्यक्तींविषयी सावध राहावे, असेही सांगितले आहे.