मुंबई : चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत श्री. किन जी यांनी आज Municipal Corporation of Greater Mumbai मुख्यालयातील महापौर दालनात मुंबईच्या महापौर Ritu Tawde यांची सदिच्छा भेट घेतली. महापौरपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांनी रितू तावडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान भारत-चीन तसेच मुंबई आणि चीनमधील प्रमुख शहरांदरम्यान द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. सांस्कृतिक देवाणघेवाण, व्यापार-उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, पर्यटन तसेच शाश्वत विकास या विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संधींवर सकारात्मक संवाद साधण्यात आला.
किन जी यांनी मुंबई महानगरातील वेगाने उभ्या राहत असलेल्या पायाभूत सुविधा, वाहतूक प्रकल्प, किनारी रस्ता, मेट्रो नेटवर्क आणि स्मार्ट सिटी उपक्रमांचा विशेष उल्लेख केला. या विकासकामांमुळे मुंबईचे जागतिक स्तरावरचे स्थान अधिक भक्कम झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, चीनमधील काही प्रमुख शहरांसोबत ‘सिस्टर सिटी’ संकल्पनेअंतर्गत सहकार्य वाढवण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
महापौर रितू तावडे यांनी मुंबई ही आंतरराष्ट्रीय आर्थिक राजधानी आणि सांस्कृतिक वैविध्याचे प्रतीक असल्याचे सांगितले. भविष्यातील सहकार्यामुळे दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये विश्वास, मैत्री आणि परस्पर संवाद अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील गुंतवणूक, नवउद्योग, हरित ऊर्जा आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांमध्ये परदेशी भागीदारीला प्रशासन सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी चीन वाणिज्य दूतावासातील अधिकारी श्री. वांग जिनशेंग देखील उपस्थित होते. सदिच्छा भेटीचा समारोप परस्पर शुभेच्छा आणि भविष्यातील सहकार्याच्या अपेक्षांसह झाला. मुंबई आणि चीनमधील शहरांदरम्यान सहकार्याची नवी दिशा ठरवणारी ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.