पुणे : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपीला अवघ्या दोन तासांत अटक करत ४,२५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे.
दिनांक १२/०२/२०२६ रोजी फिर्यादी यांनी घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना अज्ञात व्यक्तीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि अंदाजे २,९०,००० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ६४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव आणि त्यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अवघ्या दोन तासांत संशयित आरोपीस ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आदित्य अरुण गरड (वय १९ वर्षे), रा. फ्लॅट नं. ३०५, शुभयोग रेसिडेन्सी, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे असे आहे. आरोपीकडून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ४,२५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०६ डॉ. राजकुमार शिंदे आणि मा. सहा. पोलीस आयुक्त लोणी काळभोर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती स्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस अंमलदार सागर जगदाळे, रामहरी वणवे, संभाजी देवीकर, अण्णा माने, प्रविण दडस, सुरज कुंभार, प्रशांत सुतार, सचिन सोनवणे, राहुल कर्डीले, अशोक गिरीया यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. पुणे शहर पोलीसांकडून घरफोडी आणि मालमत्ता गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू असून, नागरिकांनी घर सुरक्षित ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, मजबूत कुलपे आणि शेजाऱ्यांशी संपर्क राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.