महाराष्ट्रात महिंद्राची ₹15,000 कोटींची मेगा गुंतवणूक; 15 हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती, ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मंजुरी
मुंबई/नागपूर : महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला मोठी चालना देणारा आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणारा महत्त्वपूर्ण निर्णय आज जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांच्यात विविध प्रमुख क्षेत्रांमध्ये नवीन ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधा उभारण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या कराराअंतर्गत राज्यात तब्बल ₹15,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून 15,000 हून अधिक थेट व अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे नागपूर, इगतपुरी आणि छत्रपती संभाजीनगर परिसरातील स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे.
या प्रकल्पामध्ये ICE आणि EV प्रवासी वाहने, हलकी, मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहने, ट्रॅक्टर व शेती यंत्रसामग्री तसेच महिंद्रा ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज लिमिटेडची उत्पादने तयार केली जाणार आहेत. याशिवाय ‘कॅप्टिव्ह सप्लायर पार्क’ उभारण्यात येणार असून त्यामुळे स्थानिक पुरवठादारांना थेट उद्योग साखळीत सहभागी होता येणार आहे.
एमआयडीसी बुटीबोरी (नागपूर), एमआयडीसी आडवण (इगतपुरी) आणि छत्रपती संभाजीनगर येथे या आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्वयंचलित उत्पादन प्रक्रिया आणि पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती यांचा अवलंब करून या प्रकल्पांची उभारणी होणार आहे. विशेष म्हणजे, ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) क्षेत्रावर भर दिल्यामुळे महाराष्ट्र हरित ऊर्जा व शाश्वत विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र उद्योगांसाठी सर्वाधिक अनुकूल राज्य आहे. गुंतवणूक, रोजगार आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्याला देशातील अग्रगण्य औद्योगिक केंद्र बनवण्याचा आमचा संकल्प आहे. महिंद्राची ही गुंतवणूक राज्याच्या विकासाला नवी दिशा देईल.”
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या प्रकल्पाचे स्वागत करताना नागपूर व विदर्भ औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे झळकतील, असा विश्वास व्यक्त केला. महिंद्रा अँड महिंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश जेजुरीकर यांनी सांगितले की, “महाराष्ट्रात उत्पादन सुविधा उभारल्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कंपनीची क्षमता वाढेल.”
स्थानिक युवकांना रोजगार, कौशल्यविकास प्रशिक्षण आणि पुरवठा साखळीतील संधी उपलब्ध होणार असल्याने या प्रकल्पामुळे सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला या गुंतवणुकीतून मोठे बळ मिळणार आहे.