Home Breaking News जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे : राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार लोकशाहीचा पवित्र उत्सव साजरा करताना मतदान अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्ये जबाबदारीने बजाविण्याबाबत सूचना दिल्या आहेत; पात्र मतदारांनी निवडणुकीकरिता उर्त्स्फूतपणे मतदान करावे, नागरिक व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसहिंतेचे पालन करून शांततेत पूर्ण प्रक्रिया पार पाडावी, संपूर्ण निवडणुकीच्या कामकाजाकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
जिल्हा परिषदेच्या 73 गट व पंचायत समितीच्या 146 गणाकरिता शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 असून मतदानापुर्वी मॉक पोल घेतला जाणार आहे.  मतदानाच्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारी  रोजी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा समाज माध्यमांमध्ये कुठल्याच प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत.
मतदानाकरिता सार्वजनिक सुट्टी
मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यक्षेत्रात 3 फेब्रुवारीच्या महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेद्वारे शनिवार, 7 फेब्रुवारी  रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सार्वजनिक सुट्टी मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना सुद्धा लागू राहील. केंद्र शासनाच्या शासकीय, निम्न शासकीय कार्यालय, सार्वजनिक उपक्रम बँका आदींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. येत्या 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानाकरिता जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.
जिल्ह्यात 3 हजार 605 मतदान केंद्र
बारामती तालुक्यात 299, मावळ 243, मुळशी 227, शिरुर 337, हवेली 263, दौंड 317, इंदापूर 400, पुरंदर 235, भोर 237, वेल्हे 105, आंबेगाव 239, जुन्नर 366 आणि खेड 337 तालुक्यात असे एकूण 3 हजार 605 मतदान केंद्र आहेत. यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 13 आदर्श व महिला मतदान केंद्र तसेच हवेली, भोर आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी 1 याप्रमाणे 3 परदानशीन मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रियेकरिता  14 हजार 318 बॅलेट युनिट, 5 हजार 813 कंट्रोल युनिट यंत्र, मेमरी चीप 3 हजार 968, बॅटरी 3 हजार 991 वितरित करण्यात आले आहेत. 
जिल्ह्यात 29 लाखाहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 करिता जिल्ह्यात 3 हजार 605 मतदान केंद्र असून याअंतर्गत पुरुष 15 लाख 27 हजार 151, स्त्री 14 लाख 49 हजार 560 आणि इतर 94 असे एकूण 29 लाख 76 हजार 805 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
निवडणूक कामकाजाकरिता २३ हजाराहून अधिक कर्मचारी कार्यरत
सर्व मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आदी अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून संपूर्ण निवडणूक कामकाजाकरिता एकूण 23 हजार 114 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली  आहेत.  कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पर्याप्त व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलींग पार्टी सर्व साहित्यासहित आपआपल्या मतदान केंद्रावर पोहोचल्या असून मतदान प्रक्रियेसाठी सुसज्ज आहेत. निवडणूकीच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहेत. मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत मतदानाची टक्केवारीत वाढ होण्याकरिता विविध प्रकारचे जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले आहे.
निवडणूकीकरिता 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाची फेब्रुवारी 9 रोजी मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून करण्यात येणार आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.डुडी यांनी केले आहे.