पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाली असून भारतीय जनता पार्टीचे रवि बाबासाहेब लांडगे यांची महापौरपदी आणि शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. तब्बल चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पुन्हा लोकप्रतिनिधींच्या सभागृहाचे कामकाज सुरू झाल्याने शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी “निष्ठा, समर्पण आणि शाश्वत विकास” हीच सत्ताधारी भाजपाची त्रिसूत्री असल्याचे सांगत, नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमागे पक्षाची कार्यकर्त्यांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली.
कार्यकर्त्यांनाच संधी – भाजपाची परंपरा
महापौर रवि लांडगे हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांच्या कुटुंबाची भाजप आणि शहरासाठी दीर्घकाळ सेवा आहे. दिवंगत कै. बाबासाहेब लांडगे आणि कै. अंकुशराव लांडगे यांनी शहराच्या विकासासाठी केलेल्या योगदानाची आठवण करून देत आमदार लांडगे म्हणाले, “आज रवि लांडगे यांच्या निवडीमुळे त्यांच्या कुटुंबाच्या समर्पणाला खरी श्रद्धांजली मिळाली आहे.”
तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बाबर कुटुंबातील शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी निवड ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही मोठ्या पदांवर संधी देण्याची भाजपाची परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले.
४ वर्षांनंतर सभागृहात पुन्हा लोकशाही
महापालिकेवर गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे अनेक विकासकामांना विलंब झाला होता. आता निवडून आलेल्या प्रतिनिधींकडून शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या बैठकीला भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार शंकर जगताप, विधानपरिषद सदस्य उमा खापरे, अमित गोरखे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आनंदोत्सवाऐवजी संवेदनशीलता
नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर मोठा उत्सव न साजरा करता, राजकीय संवेदनशीलता जपण्याचे आवाहन आमदार लांडगे यांनी केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही जल्लोष न करता, नवनिर्वाचितांना “भारतीय संविधान” भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
“आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित आहोत. संविधानाच्या चौकटीत राहून विकासाचा मार्ग स्वीकारणार आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
विकासाचे नवे लक्ष्य
पिंपरी-चिंचवडला देशातील सर्वात विकसित शहरांच्या यादीत अव्वल स्थानावर नेण्याचा संकल्प व्यक्त करत आमदार लांडगे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
नव्या नेतृत्वाकडून शहरातील पायाभूत सुविधा, उद्योग, रोजगारनिर्मिती आणि नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.