परभणी : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी आयुष्यभर सामान्य माणसाच्या हक्कासाठी, शेतकरी–कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांसाठी आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य आजही जनतेच्या मनात घर करून आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या विकासकामांमुळे ग्रामीण भागाला नवी दिशा मिळाली. त्या कार्याची आठवण जपत आणि त्यांच्या विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शिवमुद्रा संघटनेने परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या ‘घड्याळ’ चिन्हावरील सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत शिवमुद्रा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय जाहीर केला. हा पाठिंबा केवळ राजकीय समीकरणांचा भाग नसून अजितदादांच्या विकासाभिमुख धोरणांवरील विश्वासाचे प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “दादांनी ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, शेतीसाठी निधी, युवकांसाठी रोजगार आणि शिक्षणाच्या सुविधा यावर सातत्याने काम केले. त्यांच्या नेतृत्वामुळे हजारो कुटुंबांचे जीवनमान उंचावले. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे आहोत.”
परभणी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका, संवाद मेळावे आणि जनसंपर्क मोहीम सुरू करण्यात आली असून ‘घड्याळ’ चिन्हासमोरील उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. युवक, महिला व शेतकरी वर्गात या निर्णयाचे स्वागत होत असून निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवर मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, शिवमुद्रा संघटनेच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बळकटी मिळण्याची शक्यता असून स्थानिक राजकारणात याचा महत्त्वपूर्ण परिणाम दिसू शकतो.
“दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली,” असे सांगत पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार बांधवांना ७ तारखेला मतदान करून ‘घड्याळ’ चिन्हाला साथ देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.