Home Breaking News निगडी–दापोडी रस्त्यावरील भुयारी मार्गाला लवकरच गती; हलक्या वाहनांसाठी सुरक्षित आणि थेट मार्ग...

निगडी–दापोडी रस्त्यावरील भुयारी मार्गाला लवकरच गती; हलक्या वाहनांसाठी सुरक्षित आणि थेट मार्ग उपलब्ध होणार

45
0
पिंपरी–चिंचवड :
शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता निगडी–दापोडी रस्त्यावरील पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपूलासमोर हलक्या वाहनांसाठी भुयारी मार्ग (Light Vehicular Underpass) उभारण्याच्या कामाला आता वेग मिळणार आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन तातडीने निविदा प्रक्रिया सुरू करण्याची ठोस मागणी केली आहे.
सध्या पिंपरी LC गेट क्र. ६० येथे उभारण्यात येत असलेला चार पदरी रेल्वे उड्डाणपूल अंतिम टप्प्यात असून त्याचे लोकार्पण लवकरच होणार आहे. हा उड्डाणपूल पिंपरी गाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर आणि निगडी परिसरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार असला, तरी उड्डाणपूलावरून येणाऱ्या वाहनांना पुणे–मुंबई महामार्ग ओलांडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत वळसा घ्यावा लागतो, त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.
वाहतूक कोंडीवर ठोस उपाय
ही समस्या कायमची सोडवण्यासाठी भुयारी मार्ग हा प्रभावी पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भुयारी मार्ग पूर्ण झाल्यास हलकी वाहने थेट महामार्गाखालून मार्गक्रमण करू शकतील. त्यामुळे सिग्नलवरील गर्दी कमी होऊन वेळ, इंधन आणि श्रमांची बचत होणार आहे.
नगरसेवक वाघेरे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करत सल्लागाराची नियुक्ती करून सविस्तर अंदाजपत्रक तयार केले. अंदाजपत्रकीय समितीकडून या प्रकल्पाला तत्वतः मान्यता मिळाली आहे.
४० कोटींच्या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी
सदर प्रकल्पाचा समावेश सन २०२५–२६ च्या महापालिका अंदाजपत्रकात करण्यात आला असून एकूण ४० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी प्रारंभी १० लाखांची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता ३० सप्टेंबर २०२५ रोजी महापालिका सभेत मंजूर करण्यात आली आहे.
नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
भुयारी मार्ग उभारणीमुळे शाळकरी विद्यार्थी, कामगार, व्यापारी तसेच दैनंदिन प्रवासी यांना सुरक्षित, जलद आणि सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते सतीश गावडे, राकेश मोरे, सतीश लांडगे आदी उपस्थित होते. शहराच्या वाहतूक नियोजनात हा प्रकल्प महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.
पिंपरी–चिंचवडमधील वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर अशा पायाभूत सुविधा प्रकल्पांना वेग देणे ही काळाची गरज असून, या भुयारी मार्गामुळे निगडी–पिंपरी–दापोडी परिसरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.