नाशिक : महाराष्ट्रातील इतर मोठ्या शहरांप्रमाणेच नाशिक शहरही देशाच्या उत्तर-पूर्व भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे व तरुण व्यावसायिकांचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. आसाम, मणिपूर, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम व सिक्कीम या राज्यांतील विद्यार्थी व युवक नाशिकमध्ये शिक्षण, आयटी, पर्यटन व संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी समावेशकता, परस्पर विश्वास आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने “North East Students & Professionals Outreach Programme” हा विशेष उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमाअंतर्गत उत्तर-पूर्व भारतातून आलेल्या विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक तसेच सुरक्षिततेशी संबंधित समस्या समजून घेण्यासाठी नाशिक पोलीस नियमित संवाद कार्यक्रम राबविणार आहेत. पोलीस आयुक्तालय, विभागीय कार्यालये तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी, चर्चासत्रे व मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पोलीस यंत्रणेबद्दल विश्वास, सुलभता आणि आत्मविश्वास वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून या उपक्रमासाठी विशेष नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात येत आहे. हा अधिकारी उत्तर-पूर्व भारतातील विद्यार्थ्यांशी व व्यावसायिकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या अडचणी, तक्रारी व सूचना समजून घेणार आहे. कोणतीही समस्या उद्भवल्यास तात्काळ मदत मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
उत्तर-पूर्व भारतातील विद्यार्थी समन्वयक, स्वयंसेवक व संघटनांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन नाशिक पोलिसांकडून करण्यात आले आहे. इच्छुकांनी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या व्हॉट्सॲप क्रमांक ९९२३३२३३११ वर संदेश पाठवून संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
हा उपक्रम केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरता मर्यादित न राहता, सांस्कृतिक समन्वय, आपुलकीची भावना आणि “नाशिक – सर्वांसाठी सुरक्षित शहर” ही संकल्पना अधिक बळकट करणारा ठरणार आहे. विविधतेत एकता जपणाऱ्या नाशिक शहरासाठी हा उपक्रम एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पाऊल मानले जात आहे.