Home Breaking News ट्राफिक सिग्नल बंद पाडणाऱ्या बॅटरी चोरट्या टोळीचा वानवडी पोलिसांकडून पर्दाफाश; 34 बॅटरींसह...

ट्राफिक सिग्नल बंद पाडणाऱ्या बॅटरी चोरट्या टोळीचा वानवडी पोलिसांकडून पर्दाफाश; 34 बॅटरींसह चार जण जेरबंद, पाच गुन्ह्यांचा उलगडा

5
0
पुणे : शहरातील वाहतूक व्यवस्थेला थेट बाधा आणणाऱ्या ट्राफिक सिग्नल कंट्रोलर बॉक्समधील बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा वानवडी पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. सिग्नल लाईट गेल्यानंतरही बॅटरीवर चालणारी यंत्रणा ठप्प करून नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या या टोळीतील चार जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातून तब्बल 34 बॅटऱ्या, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि इतर साहित्य असा सुमारे ₹1.68 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील प्रमुख चौकांमध्ये ट्राफिक कंट्रोलर बॉक्स बसविण्यात आले आहेत. वीज गेल्यानंतरही सिग्नल सुरू राहण्यासाठी या बॉक्समध्ये बॅटरी बसविल्या जातात. मात्र काही दिवसांपासून कानुबाई चौक, ए.एफ.एम.सी. चौक, रेसकोर्स चौक आदी ठिकाणांहून बॅटऱ्या चोरीस जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे सिग्नल बंद पडून वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका निर्माण होत होता.
दि. 27 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या तक्रारीनुसार वानवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्याकडे सोपविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुप्त माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढला.
दि. 30 जानेवारी रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी दीपक कांबळे व त्याचे साथीदार चोरी केलेल्या बॅटऱ्या विक्रीसाठी रिक्षामधून फिरत आहेत. तत्काळ पोलिसांनी सापळा रचून शेवकरवस्ती जवळील रेल्वे फाटक परिसरात संशयित रिक्षाला घेराव घातला. रिक्षामध्ये असलेल्या चार जणांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता 34 बॅटऱ्या, लोखंडी कटावणी व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा मुद्देमाल आढळून आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दीपक अमोल कांबळे (रिक्षाचालक), चाँद उस्मान शेख (स्क्रॅप व्यवसाय), विकास उर्फ टकल्या माने (भंगार वेचणे) व अली मुल्ला शेख (मजूर) अशी आहेत. चौकशीत त्यांनी शहरातील विविध चौकांमधून बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या विरोधात वानवडी, लक्ष्मीनगर, लष्कर व मार्केटयार्ड पोलीस ठाण्यांमध्ये मिळून एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
या कारवाईमुळे शहरातील ट्राफिक सिग्नल यंत्रणेची तोडफोड करणाऱ्या टोळीचा कायमचा बंदोबस्त झाला असून वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनीही पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नम्रता देसाई व वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या पथकाने केली. पोलिसांनी नागरिकांना संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ ‘डायल 112’ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.