पुणे : आंबेगाव परिसरातील नामांकित ‘चितळे बंधू’ दुकानात घरफोडी करून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत एका विधीसंघर्षित बालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या चौकशीत एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ₹1,24,600 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 10.15 ते दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 7.45 या दरम्यान विंडसर काऊंटी सोसायटी, दत्तनगर-न्हे रोड, आंबेगाव येथे असलेल्या वेद फुड चितळे बंधू गाळा क्रमांक 14 व 15 चे शटर उचकटून चोरी करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. दुकानातील रोख रक्कम व अन्य साहित्य चोरीस गेले होते.
या प्रकरणी आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. क्र. 31/2026 भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 305(अ), 331(4), 331(3), 324(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पथकाने घटनास्थळाचा बारकाईने पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गुप्त बातमीदारांमार्फत माहिती गोळा करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपींची ओळख पटल्याने पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व त्यांच्या पथकाने सापळा रचून ओमकार मारुती देडे (वय 21 वर्षे, रा. किरकटवाडी, धायरी, पुणे) यास अटक केली. त्याच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघांनी चोरीची कबुली दिली.
पोलिस तपासात आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्यांच्या विरोधात आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक गुन्हा (गु. रजि. क्र. 34/2026) तसेच विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये 2023 मधील चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एकूण तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
आरोपींकडून एक ऑटो रिक्षा, एक मोटारसायकल व रोख रक्कम असा एकूण ₹1,24,600 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) श्री. राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त श्री. मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांनी नागरिकांना संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलीसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.