नाशिक शहरात राष्ट्रप्रेमाचा जागर करणारा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी उपक्रम साकारला गेला. झेप कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आर.पी. विद्यालय, नाशिक येथे तब्बल ३१ हजार शाळकरी विद्यार्थ्यांचे राष्ट्रभक्तीपर सामूहिक गायन मोठ्या उत्साहात पार पडले. या भव्य कार्यक्रमाला राज्याचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली.
हजारो विद्यार्थी एकाच सुरात राष्ट्रभक्तीपर गीतांचे गायन करत असताना संपूर्ण परिसर राष्ट्रप्रेमाने भारावून गेला होता. तिरंग्याच्या साक्षीने, देशभक्तीच्या घोषणांनी आणि गीतांनी विद्यार्थ्यांच्या आवाजात उमटलेली एकजूट पाहून उपस्थित प्रत्येकजण भावूक झाला. गिरीश महाजन यांनी हा क्षण “अविस्मरणीय आणि प्रेरणादायी अनुभव” असल्याचे सांगत, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा राष्ट्रप्रेमी पिढीचे घडवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, एकता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, अशा उपक्रमांमुळे शिक्षणासोबत संस्कारांचेही बीज रोवले जात असल्याचे सांगत आयोजकांचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाला आमदार श्रीमती सीमा हिरे, महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर गुरमित बग्गा यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक करत, नाशिकमध्ये असा उपक्रम घडवून आणल्याबद्दल झेप कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अभिनंदन केले.
हा उपक्रम नाशिकच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक इतिहासात एक सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा क्षण ठरला असून, पुढील पिढीला राष्ट्रप्रेमाची दिशा देणारा ठसा उमटवून गेला आहे.