ठाणे : ठाणे महापालिकेच्या आगामी महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय हालचालींना वेग आला. महापौर पदासाठी सौ. शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर पदासाठी श्री. कृष्णा पाटील यांनी आज आपले नामांकन अर्ज अधिकृतपणे दाखल केले. या महत्त्वपूर्ण प्रसंगी शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब स्वतः उपस्थित राहून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
नामांकन प्रक्रियेच्या वेळी ठाणे महापालिका परिसरात उत्साही वातावरण पाहायला मिळाले. शिवसेना–महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवून दिली. यावेळी खासदार श्री. नरेश म्हस्के, माजी आमदार श्री. रविंद्र फाटक, ठाणे जिल्हा महिला संघटक सौ. मीनाक्षी शिंदे यांच्यासह शिवसेना–महायुतीचे अनेक प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेत सक्षम, अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज आहे. सौ. शर्मिला पिंपळोलकर आणि श्री. कृष्णा पाटील हे दोन्ही उमेदवार संघटनात्मक अनुभव, सामाजिक बांधिलकी आणि विकासाभिमुख दृष्टिकोन असलेले असून, ठाणे शहराच्या प्रगतीसाठी ते प्रभावी काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापौर पदाच्या उमेदवार सौ. शर्मिला पिंपळोलकर यांनी जनतेचे प्रश्न, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि स्वच्छता यावर विशेष भर देण्याचा निर्धार व्यक्त केला. तर उपमहापौर पदाचे उमेदवार श्री. कृष्णा पाटील यांनी ठाणे शहराला आधुनिक, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख बनवण्यासाठी महापालिकेत सकारात्मक व निर्णयक्षम भूमिका निभावण्याचे आश्वासन दिले.
या नामांकनामुळे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना–महायुतीची भूमिका अधिक भक्कम झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असून, येत्या काळात निवडणूक प्रचाराला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.