Home Breaking News नवले ब्रिजवर ३ दिवस सकाळी वाहतूक बंद; स्पीड कॅमेरे बसविण्याचे काम, प्रवाशांसाठी...

नवले ब्रिजवर ३ दिवस सकाळी वाहतूक बंद; स्पीड कॅमेरे बसविण्याचे काम, प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना

88
0
पुणे: पुणे–सातारा महामार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज हा मार्ग अपघातप्रवण ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावर स्पीड नियंत्रण कॅमेरे व गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत दररोज सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत (दोन तास) साताराकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
या तात्पुरत्या वाहतूक बंदीमुळे संभाव्य वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता, मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन आधीच करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी कात्रज जुना बोगदा तसेच सेवा रस्त्यांचा (Service Roads) वापर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) कार्यालयाचे प्रकल्प संचालक यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, पुण्यातील अपघातप्रवण १९ रस्त्यांच्या यादीत नवले पूल हा सर्वाधिक धोकादायक मार्ग म्हणून समोर आला आहे. या ठिकाणी सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच कारणामुळे पुणे वाहतूक पोलिसांनी या परिसरात कडक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.
कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज या दरम्यान आता ४० किमी प्रतितास वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. यापूर्वी येथे ३० किमी प्रतितास वेगमर्यादा होती. नव्या नियमानुसार वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेरे, स्पीड गन आणि नव्याने बसविण्यात येणारे स्पीड कॅमेरे यांच्या माध्यमातून कठोर कारवाई केली जाणार आहे.
प्रशासनाचे म्हणणे आहे की, या उपाययोजनांमुळे भविष्यातील अपघातांमध्ये लक्षणीय घट होईल आणि महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होईल. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.