Home Breaking News वाघोलीतील हृदयद्रावक घटना: आईकडून चिमुकल्याची निर्घृण हत्या, मुलीवर प्राणघातक हल्ला

वाघोलीतील हृदयद्रावक घटना: आईकडून चिमुकल्याची निर्घृण हत्या, मुलीवर प्राणघातक हल्ला

60
0
पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरातील वाघोली परिसरातून मन सुन्न करणारी घटना समोर आली असून, कौटुंबिक कलहाचा शेवट अत्यंत भीषण स्वरूपात झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बाइफ रोडवरील पठाण हाईट्स या इमारतीत एका आईने आपल्या अल्पवयीन मुलाचा गळा कापून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत आरोपी महिलेने आपल्या मुलीवरही जिवे मारण्याच्या उद्देशाने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली असून, सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव साईराज संतोष जायभाय असून, आरोपी महिला सोनी संतोष जायभाय (वय २९) आहे. संतोष जायभाय हे पत्नी व दोन मुलांसह अवघ्या आठ दिवसांपूर्वीच सदर इमारतीत भाड्याने राहायला आले होते. संतोष जायभाय हे पोकलँड मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करत होते. मात्र त्यांना दीर्घकाळापासून दारूचे व्यसन होते. याच व्यसनामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असून, याआधीच्या घरमालकानेही त्यांना घर रिकामे करण्यास सांगितले होते.
दारूच्या व्यसनामुळे पती घराकडे, पत्नी व मुलांकडे दुर्लक्ष करत असल्याने सोनी जायभाय या दीर्घकाळ मानसिक तणावाखाली होत्या. दि. २६/०१/२०२६ रोजी संतोष जायभाय दारू पिऊन घरी आल्याने पुन्हा एकदा पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर दि. २७/०१/२०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता, संतोष जायभाय हे पत्नीशी भांडण करून घरातून निघून गेले.
काही वेळातच घरातून लहान मुलीचा आक्रोश ऐकू आल्याने शेजारील पठाण कुटुंबीय घटनास्थळी धावले. खिडकीतून पाहिल्यावर त्यांना साईराज रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला दिसला. प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की, सोनी जायभाय हिने विळ्याने आपल्या मुलाचा गळा कापून हत्या केली, तसेच मुलगी धनश्री हिच्या गळ्यावर वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी धनश्री हिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांनी तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक ७४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी महिला सोनी जायभाय हिला अटक करण्यात आली आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण वाघोली परिसरात शोककळा पसरली असून, कौटुंबिक तणाव, व्यसनाधीनता आणि मानसिक अस्थैर्य यांचे भयावह परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.