Home Breaking News अजित पवार यांच्या निधनाने राज्य शोकसागरात; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबीयांचे सांत्वन

अजित पवार यांच्या निधनाने राज्य शोकसागरात; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबीयांचे सांत्वन

पुणे | प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपस्थित राहून अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व कुटुंबीयांचे सांत्वन केले.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अजित पवार यांच्या राजकीय व सामाजिक योगदानाचा उल्लेख करत, त्यांच्या निधनाने राज्याने एक अनुभवी, परखड आणि कार्यक्षम नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुःखद घटनेमुळे राज्य सरकार आणि प्रशासनावर मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सांगत, पवार कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या क्षणी संपूर्ण महाराष्ट्र पवार कुटुंबीयांच्या पाठीशी उभा असल्याचे नमूद केले.
यावेळी केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजारापू, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे, बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले उपस्थित होते. तसेच अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्यासह अनेक मान्यवर, नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निर्णयक्षम नेतृत्वामुळे प्रशासनावर वचक, विकासाभिमुख भूमिका आणि परखड शैलीमुळे ते जनमानसात “दादा” म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक जाण्याने केवळ पवार कुटुंबीयांनाच नव्हे, तर संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे.
राजकीय, सामाजिक आणि सहकारी क्षेत्रातून श्रद्धांजलींचा ओघ सुरू असून, राज्यभरात विविध ठिकाणी शोकसभा आणि श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अजित पवार यांचे योगदान कायम स्मरणात राहील, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.