पुणे शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात गुन्हे शाखा पुणे शहरने कडक भूमिका घेत प्रभावी कारवाई केली आहे. गुन्हे शाखा युनिट–०५ च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एका पोलीस अभिलेखावरील सराईत आरोपीकडून ०१ गावठी बनावटीचे पिस्टल हस्तगत करून त्याला जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांवर मोठा आघात बसला आहे.
पुणे शहरात अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट–०५ चे पथक अवैध शस्त्रांविषयी माहिती संकलन करत होते.
दि. २६/०१/२०२६ रोजी पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी चेतन बाळु जाधव (वय २५) हा मगरपट्टा ब्रिजखाली गावठी पिस्टलसह येणार आहे.
तत्काळ सापळा रचून मगरपट्टा ब्रिजखालील दुचाकी पार्किंग, हडपसर येथे कारवाई करण्यात आली. संशयित चेतन बाळु जाधव (रा. पाण्याच्या टाकीजवळ, करंजे नगर, शिक्रापूर–चाकण चौक, पुणे) याला ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून ०१ गावठी पिस्टल जप्त करण्यात आले. सदर आरोपी हा पोलीस अभिलेखावरील असून, त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे–२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार तसेच अंमलदार तानाजी देशमुख, राहुल ढमढेरे, अमित कांबळे, परमेश्वर कदम, अमर चव्हाण, विनोद शिवले, शशिकांत नाळे, गणेश माने, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, अकबर शेख, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, शहाजी काळे, प्रशांत कर्णवर, अविनाश इंगळे, नानासाहेब मोरे, नेत्रिका अडसुळ व नासिर देशमुख यांचा समावेश होता.
पुणे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध शस्त्रसाठा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यास मदत होणार असून, नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशाच कडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.