Home Breaking News खंडणीविरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त

खंडणीविरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त

55
0
पुणे शहरातील वाढत्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अत्यंत प्रभावी आणि वेळेत कारवाई करत एका सराईत गुन्हेगारास अटक केली असून त्याच्याकडून गावठी पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा धक्का बसला आहे.
दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी खंडणीविरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे व पथकातील कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपी सागर गणेश सुतार हा गावठी पिस्टल बाळगून देशमुखनगर, शिवणे येथील मोकळ्या जागेत बसलेला आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी जगताप यांना कळवण्यात आली.
मिळालेल्या आदेशानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून रोहन दांगट देशमुखनगर, इंगळे कॉर्नर, शिवणे परिसरातून आरोपी सागर गणेश सुतार (वय २५, रा. गणपती माथा, वारजे पुणे) याला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडे एक सिल्व्हर रंगाचे गावठी पिस्टल व मॅगझिनमध्ये ०४ जिवंत काडतुसे असा एकूण ४०,८०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
नमूद आरोपीविरुद्ध उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ०५/२०२६ अन्वये आर्म अॅक्ट कलम ३ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात समोर आले की, आरोपीवर यापूर्वीही वारजे माळवाडी, उत्तमनगर व सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न, चोरी आणि शस्त्र कायद्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास उत्तमनगर पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगाव, पोउपनि रामेश्वर पार्वे आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली. पुणे पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत झाली असून, गुन्हेगारी प्रवृत्तींना कठोर इशारा देण्यात आला आहे.