Home Breaking News दुध टाकण्याच्या बहाण्याने उच्चभ्रू सोसायटीत घरफोडी; विमानतळ पोलिसांची सतर्क कारवाई, चोरटा जेरबंद

दुध टाकण्याच्या बहाण्याने उच्चभ्रू सोसायटीत घरफोडी; विमानतळ पोलिसांची सतर्क कारवाई, चोरटा जेरबंद

51
0
पुणे शहरातील उच्चभ्रू वसाहतींमध्ये वाढणाऱ्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विमानतळ पोलिसांनी अत्यंत चोख आणि तांत्रिक तपास करत दुध टाकण्याच्या बहाण्याने घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक केली आहे. न्यु एअरपोर्ट रोडवरील ‘अॅमिनन्स बाय नाईकनवरे’ या नामांकित सोसायटीत राहणारे नागरिक सूर्यनारायण राजरतिलम यांच्या घरातून दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी पहाटे 1 लाख 32 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती.
तक्रारीनंतर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास पथकाने तातडीने कारवाई सुरू केली. तपासादरम्यान सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करण्यात आली. त्यामध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास दुध देण्यासाठी येणारा इसम संशयास्पद हालचाली करताना स्पष्टपणे दिसून आला. याच फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला.
तपासातून व्यंकटेश वसंत करंडे (वय 34, रा. विद्यानगर, वडगावशेरी, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने दुध टाकण्याच्या निमित्ताने सोसायटीत प्रवेश करून घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी केलेली संपूर्ण 1 लाख 32 हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून, गुन्हा पूर्णतः उघडकीस आला आहे.
या घटनेमुळे उच्चभ्रू सोसायट्यांमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींविषयी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच सीसीटीव्ही यंत्रणेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-4) श्री. सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त (खराडी विभाग) श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या आदेशान्वये पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोविंद जाधव आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली.
पुणे पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढला असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.