पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात कडक सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येत असून, मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार सो. यांनी स्वतः विविध मतदान केंद्रांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
मतदान प्रक्रिया सुरळीत, शांततामय आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. पाहणीदरम्यान श्री. अमितेश कुमार यांनी बंदोबस्तावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या.
मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व महिला मतदारांना सुरक्षित व सुलभ मतदान करता यावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कुठल्याही अफवा, गैरप्रकार किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक स्तरावर दक्षता ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्तांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे पोलिस दलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्येही विश्वास व सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे. “लोकशाहीचा उत्सव भयमुक्त वातावरणात पार पडावा, हेच आमचे ध्येय आहे,” असा संदेश त्यांनी यावेळी दिला. शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस यंत्रणा सज्ज असून, पुणेकरांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.