पुणे महापालिका निवडणूक २०२६ च्या मतमोजणीदरम्यान दुपारी १.३० वाजेपर्यंत भाजपाने शहरावर आपले वर्चस्व ठामपणे सिद्ध केले आहे. तब्बल ५० हून अधिक जागांवर आघाडी घेत भाजपाने राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. ताज्या आकडेवारीनुसार भाजप ५२ जागांवर आघाडीवर असून, ‘एकत्र आलेल्या पवारांच्या’ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना केवळ ७ जागांवरच समाधान मानावे लागत आहे.
विशेष म्हणजे, पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजप आघाडीवर आहे. २०१७ ते २०२२ या काळात सलग पाच वर्षे भाजपाने एकहाती सत्ता राखली होती. त्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित राहिल्याने निवडणुका रखडल्या आणि प्रशासकांकडे कारभार गेला. २००७ ते २०१७ या दहा वर्षांच्या राष्ट्रवादीच्या सत्तेला भाजपाने ब्रेक लावत शहराच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला होता.
मतदानाची टक्केवारी
या निवडणुकीत पुण्यात एकूण ५२.४२ टक्के मतदान झाले.
-
सर्वात कमी मतदान: औंध-बोपोडी प्रभागात ४५.१२%
-
त्यानंतर: वानवडी-साळुंके विहार – ४५.५४%
-
सर्वाधिक मतदान: शिवणे-खडकवासला-धायरी प्रभागात ५७.८१%





