Home Breaking News वाघोलीत अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई; २३ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

वाघोलीत अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई; २३ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले असून, त्यानुसार वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे.
दि. १३ जानेवारी २०२६ रोजी तपास पथक पेट्रोलिंग करीत असताना वाघोली ते केसनंद मार्गावरून विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार संबंधित ठिकाणी सापळा रचण्यात आला. वाघोलीकडून येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनास थांबविण्यात आले असता वाहनचालकाने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली.
वाहनचालकाने आपले नाव कपील दिगंबर शहू (वय २६, रा. लाडवावस्ती, केसनंद, ता. हवेली, जि. पुणे; मूळ गाव आंदेगाव, ता. मुखेड, जि. नांदेड) असे सांगितले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. दारू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे त्याने कबूल केले.
तपासादरम्यान पिकअप क्रमांक MH 38 X 2822 मध्ये
  • १६,७३,८४५/- रुपये किंमतीच्या ७,४४१ विदेशी दारूच्या बाटल्या
  • ७,००,०००/- रुपये किंमतीची पिकअप गाडी
असा एकूण २३,७३,८४५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई करून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ७ श्री. सोमय मुंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग श्रीमती नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन श्री. युवराज हांडे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे व तपास पथकाने केली आहे.
निवडणूक काळात अवैध दारू, पैशांची देवाणघेवाण व गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस सज्ज असून, शांततामय व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पडावी यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत.