Home Breaking News पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हडपसरमध्ये भव्य रूट मार्च; नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हडपसरमध्ये भव्य रूट मार्च; नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना

38
0
आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत हा रूट मार्च पार पडला. या रूट मार्चचा मुख्य उद्देश म्हणजे निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, समाजकंटकांवर वचक राहावा आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, हा होता.
सदर रूट मार्च मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग श्री. अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन श्री. संजय मोगले व श्री. निलेश जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
हा रूट मार्च हडपसर गाडीतळ – मंत्री मार्केट क्षेत्रीय कार्यालय – पांढरे मळा – हडपसर गावठाण मार्गे काढण्यात आला. हडपसर भाजी मंडई, मुंढवा परिसर आणि गांधी चौक या गजबजलेल्या भागांतून जाताना नागरिकांनी पोलिसांच्या उपस्थितीचे स्वागत केले.
या मोहिमेत हडपसर पोलीस स्टेशनकडील २ पोलीस निरीक्षक, १० सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक, १५० पोलीस अंमलदार, एसआरपीएफ प्लाटून तसेच होमगार्ड जवान सहभागी झाले होते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पोलिस दलामुळे परिसरात शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरण निर्माण झाले.
१५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तसेच कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी अशा प्रकारचे रूट मार्च व कडक पोलीस बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पुणे पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असून, शांततामय व निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.