Home Breaking News मांजरीत चैन स्नॅचिंगचा पर्दाफाश; ७० सीसीटीव्हींच्या आधारे आरोपी जेरबंद, सोन्याची चैन जप्त

मांजरीत चैन स्नॅचिंगचा पर्दाफाश; ७० सीसीटीव्हींच्या आधारे आरोपी जेरबंद, सोन्याची चैन जप्त

पुणे : मांजरी परिसरातील शेवाळवाडी भाजी मंडई भागात घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा पुणे शहर पोलीसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपासातून पर्दाफाश केला आहे. अवघ्या काही दिवसांत आरोपीला अटक करत त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी शुभकल्प सोसायटीजवळ, शेवाळवाडी भाजी मंडईसमोर, सोलापूर रोड, मांजरी येथे फिर्यादी महिला भाजी आणण्यासाठी जात असताना, तोंडावर रुमाल बांधलेल्या एका अनोळखी इसमाने अंधाराचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील अंदाजे ८ ग्रॅम वजनाची व सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून पलायन केले होते. या प्रकरणी मांजरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे आणि तपास पथकाने घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली. घटनास्थळापासून दरडी रोड ते गोपाळ पट्टी, मांजरी या सुमारे सात किलोमीटर परिसरातील तब्बल ७० ते ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सलग पाच ते सहा दिवस बारकाईने निरीक्षण करण्यात आले. या फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीच्या ये-जा मार्गाची खात्रीशीर माहिती मिळवण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याच्यावर नियोजनबद्ध पाळत ठेवण्यात आली. योग्य वेळी सापळा रचून संदेश शिवाजी कुंभार (वय २४, रा. स्वप्न साई बिल्डिंग, औदुंबर पार्क, गोपाळ पट्टी, मांजरी बुद्रुक, पुणे) यास ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरी केलेली ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ६ श्री. डॉ. राजकुमार शिंदे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त लोणीकाळभोर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाबासाहेब निकम यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, संदीप राठोड, सचिन जाधव, निखिल पवार, प्रशांत दुधाळ, अशोक अंधारे, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, ज्ञानेश्वर चोरमले व माधव हिरवे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या कारवाईमुळे मांजरी परिसरात वाढलेल्या चोरी व स्नॅचिंगच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असून, पुणे पोलीसांची कार्यक्षमता आणि तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.