Home Breaking News निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग उघड; येवलेवाडीमध्ये संशयित वाहनांतून रोख रक्कम व प्रचार...

निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग उघड; येवलेवाडीमध्ये संशयित वाहनांतून रोख रक्कम व प्रचार साहित्य जप्त

46
0
पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, येवलेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत आचारसंहितेच्या भंगाचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस व भरारी पथकाच्या (FST) सतर्कतेमुळे संशयित दोन वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व प्रचार साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता बधे स्टील, खडीमशीन चौक परिसरात आचारसंहितेचा भंग होत असल्याची माहिती येवलेवाडी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली. तत्काळ ही माहिती निवडणुकीसाठी नियुक्त भरारी पथकाला देण्यात आली. मिळालेल्या सूचनेनुसार येवलेवाडी पोलीस व FST पथक घटनास्थळी दाखल झाले.
तेथे टोयोटा इनोव्हा (क्रमांक MH-12 RL 3009) आणि ब्रिझा (क्रमांक MH-12 QC 3009) अशी दोन वाहने लॉक अवस्थेत आढळून आली. संशयाच्या आधारे दोन्ही वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. इनोव्हा वाहनातून ५०० रुपयांच्या दोन बंडलमध्ये एकूण १ लाख रुपये रोख रक्कम सापडली.
तसेच, दुसरी संशयित ब्रिझा गाडी दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी येवलेवाडी पोलीस स्टेशन येथे उघडून तपासण्यात आली असता, त्यामध्ये
  • एक खाकी बॉक्स
  • मतदारांची यादी
  • २२५ पांढरे रिकामे लिफाफे
  • ८० खाकी रंगाचे रिकामे लिफाफे
  • २१ लहान वह्या
  • ८ मोठ्या वह्या
  • १२ पॅम्पलेट
असे निवडणूक संदर्भातील साहित्य आढळून आले. या संपूर्ण प्रकरणात पंचनामा करून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सदर बाबत निवडणूक अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-०५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त लोणी काळभोर विभाग श्रीमती अनुराधा उदमले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक येवलेवाडी पोलीस स्टेशन श्री. अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने केली आहे.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी पुणे पोलीस पूर्णतः सज्ज असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. नागरिकांनीही कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.