मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असतानाच, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार आहे. या घोषणेमुळे गावोगावी प्रचारसभा, बैठका आणि राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे, त्या ठिकाणी निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्या निर्देशांनुसार राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
या निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पुन्हा लोकप्रतिनिधी मिळणार असून, विकासकामांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी दीर्घकाळ प्रशासक राजवट असल्याने नागरिकांमध्ये निवडणुकांबाबत उत्सुकता आणि उत्साह निर्माण झाला आहे.
निवडणूक कार्यक्रम
-
उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया : १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६
-
अर्जांची छाननी : २२ जानेवारी २०२६
-
उमेदवारी अर्ज माघार : २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत)
-
अंतिम यादी व चिन्ह वाटप : २७ जानेवारी (दुपारी ३.३० नंतर)
-
मतदान : ५ फेब्रुवारी २०२६
-
मतमोजणी व निकाल : ७ फेब्रुवारी २०२६
आकडेवारी
-
एकूण मतदार : २.०९ कोटी
-
महिला मतदार : १.०३ कोटी
-
पुरुष मतदार : १.०७ कोटी
-
इतर : ४७३
-
मतदान केंद्रे : २५,४८२





